बिहारी लोकांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या आरोपावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात दिल्ली न्यायालयाने यापूर्वी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची स्थगिती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. २००८ मध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या खंडपीठात याच आशयाच्या याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्या एकत्र कराव्यात अशी विनंती ठाकरे यांच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायमूर्ती व्ही. पी. वैश्य हे निर्देश दिले. ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अरविंद निगम यांनी युक्तिवाद करताना, एका खंडपीठाने याची सुनावणी करावी असे सुचवले. त्यावर न्यायमूर्ती राणी यांनी ३१ ऑगस्टपर्यंत याची सुनावणी तहकूब करून एकाच पीठाकडून याची सुनावणी व्हावी असे स्पष्ट केले. फौजदारी स्वरूपाची तक्रारी रद्द कराव्यात यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.