कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी या घडीला सीबीआयच्या ताब्यात देण्याची विनंती करणारी याचिका कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. न्या. ए. के. बॅनर्जी आणि न्या. एम. के. चौधरी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका खंडपीठाने फेटाळली असली तरी सदर प्रकरण न्यायालयाने खंडपीठापुढे प्रलंबित ठेवले आहे. सध्या पश्चिम बंगाल पोलीस या घोटाळ्याचा तपास करीत असून, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खंडपीठाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत.
या घोटाळ्याची तीव्रता आणि त्याचे होणारे परिणाम पाहता शारदा समूहाचे प्रमुख सुदीप्त सेन याच्यासह या घोटाळ्यात कोणाचा हात आहे त्याची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी एका याचिकाकर्त्यांच्या वतीने विकास भट्टाचारजी या वकिलांनी केली.
या घोटाळ्याची पाळेमुळे केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे, तर अन्य राज्यांमध्ये आणि परदेशातही असल्याने सीबीआय अथवा कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवादही वकिलांनी केला. त्यानंतर खंडपीठाने या जनहित याचिकांसाठी एका न्यायमित्राची नियुक्ती केली. सध्याच्या घडीला सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे न्यायमित्राने सांगितले.