सध्या करोनानं देशभरात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थचक्रही थांबलं आहे. अनेक कंपन्यांच्या समोर आर्थिक प्रश्न उभे ठाकले आहेत. यानंतर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठिण काळातही एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीनं आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचं ठरवण्यात आलं आहे. तसंच येत्या काळात १५ हजार जणांची भरती करण्यात येणार असल्याची माहितीही एचसीएल टेक्नॉलॉजीकडून देण्यात आली. परंतु कंपनीच्या या निर्णयामागचं कारण पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

“या काळात कंपनीकडे असलेले कोणतेही प्रोजेक्ट्स रद्द झाले नाहीत. परंतु काही प्रोजेक्ट्स उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु पुढे उत्तम मार्ग दिसत आहे. आम्हाला जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे आणि त्यासाठी आम्ही भरती प्रक्रिया सुरू करत आहोत,” अशी माहिती कंपनीचे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर अप्पाराव व्हीव्ही यांनी दिली. यापूर्वी कंपनीनं आर्थिक वर्ष २०१५ नुसार १५ हजार फ्रेशर्सची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासाठी काही कालावधी जाऊ शकतो.

वेतन कपात नाही

“वाहतूक आणि उत्पादन क्षेत्राला खुप नुकसा होत आहे. त्यामुळे सर्वांसाठीच हा एक कठिण काळ आहे. सध्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. तसंच कोणत्याही कर्मचाऱ्याची वेतन कपात करण्यात येणार नाही. तसंच त्यांचा बोनसही रोखण्यात येणार नाही,” असंही अप्पाराव म्हणाले.

हे आहे कारण

“आम्ही कर्मचाऱ्यांना जो बोनस देत आहोत तो त्यांच्या गेल्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना जे आश्वासन दिलं आहे ते आम्ही पूर्ण करत आहोत. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीदरम्यानही आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली नव्हती आणि आम्ही त्या संकल्पानुसार पुढे जाणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.