कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी आणि कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या यांच्यातील धुसफूस तशी जगजाहीरच आहे. कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार कोसळताना हे प्रकर्षाने दिसूनही आले होते. मात्र आता कुमारस्वामी यांनी सिद्धरमय्यांवर थेट गंभीर आरोप केले आहेत. मी सिद्धरमय्यांचा पाळलेला पोपट नाही असे सांगत, कर्नाटकात त्यांच्यामुळेच सरकार चालू शकले नसल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला आहे.

कुमारस्वामींनी म्हटले आहे की, मी सिद्धरमय्यांचा पाळीव पोपट नाही, त्यांच्यासारखे कित्येकजण आहेत जे एचडी देवेगौडा यांच्या छत्रछायेत मोठे झाले आहेत. काँग्रेसच्या हायकमांडच्या आशिर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो होतो. तसेच, सिद्धरमय्यांनी काँग्रेस हायकमांडचे आदेश न पाळल्यामुळेच कर्नाटकातील युतीचे सरकार कोसळले असल्याचाही कुमारस्वामींनी आरोप केला.

कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युतीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार अनेकदिवस चालेल्या राजकीय नाट्यानंतर कोसळले होते. यासाठी दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे तणावपूर्ण संबंध जबाबदार ठरले. १७ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कुमारस्वामींचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर होते. परंतु कुमारस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. सध्या कर्नाटकात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आहे.