संसदेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या टीकेला, जम्मू-काश्मारीचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सडतोड उत्तर दिले आहे. अधीर रंजन संसदेत जे बोलले त्यावर उत्तर देताना राज्यपाल मलिक म्हणाले की, त्यांनी स्वतःच्या पक्षाला जमिनीत गाडलं आहे. मी त्यांच्या ज्ञानावर काय बोलू? मी माझे कार्य अत्यंत निष्ठेने करत आहे, मला या आरोपांची पर्वा नाही.

तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या श्रीनगर दौऱ्यावरही राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी टीका केली. राहुल गांधींनी माझ्या निमंत्रणास भांडवल बनवले आहे. मी त्यांना म्हटले होते की जर तुम्हाला विश्वास नसेल तर इथे या आणि पहा. नंतर त्यांनी (राहुल गांधी) म्हटले की ते नजरकैदेतील नागिराकांशी आणि जवानांना भेटू इच्छित आहे. यावर मी त्यांना ही अट मान्य नाही असे म्हटले होते व हा मुद्दा प्रशासनावर सोडण्यात आला होता.


राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हे देखील म्हटले की, राहुल गांधी यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की, त्यांच्या दौरा आणि वक्तव्याचा पाकिस्तान दुरूपयोग करू शकतो. मात्र तरी देखील राहुल गांधींनी श्रीनगरला येण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रशासनाकडून त्यांना अडवल्या गेले. आम्ही कलम ३७० हटवले आहे. तुम्ही आगामी काळात हे पाहाल की आम्ही काश्मीरच्या जनतेसाठी एवढे काम करू आणि अशी परिस्थिती निर्माण करू की ‘पीओके’मधील नागरिक म्हणू लागतील की जम्मू-काश्मीर जीवन जगण्यासाठी आदर्श ठिकाण आहे.

या अगोदर राज्यपाल मलिक यांना भारतीय जनता पार्टीचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे. कारण त्यांच्याकडून करण्यात येणारी विधाने भाजपाच्या नेत्यासारखीच आहेत, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते.