मृत्यूनंतर प्रियकर सतत स्वप्नात येऊ लागल्याने घाबरलेल्या महिलेने प्रियकराच्या घरी जाऊन आपणच त्याची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेच्या तोंडून हे ऐकून मुलाच्या आई-वडिलांना धक्का बसला. “दोन महिन्यांपूर्वी आमचे भांडण झाले. त्यानंतर मीच रशीने गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह माझ्या रुममध्ये पुरला. कृपा करुन त्याला बाहेर काढा, तो रोज माझ्या स्वप्नात येतोय” असे तिने त्याच्या आई-वडिलांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

इन्साथ मोहम्मद असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी इन्साथचा पुरलेला मृतदेह मंगळवारी रुममधून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. ती हत्या होती की, आत्महत्या हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल कारण जानू सिंह गोंद सतत तिची जबानी फिरवत आहे. जानू आणि तिची आई पार्वतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील कामाच गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. “इन्साथ मोहम्मद सतना जिल्ह्यातील एका गावामध्ये राहतो. तो हैदराबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तीन वर्षांपूर्वी जानूच्या मोबाइलवर आलेल्या एका राँग नंबरवरुन दोघे संपर्कात आले” कुसमी पोलीस ठाण्याचे प्रमुख व्ही.एन.योगी यांनी ही माहिती दिली.

ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व हैदराबादमध्ये काही काळ दोघे एकत्रही राहिले असे पोलिसांनी सांगितले. “हैदराबादला जाण्याआधी इन्साथ जानूच्या कामाच गावामधील घरातही राहिला. सुट्टीच्या काळात इन्साथ जानूच्या घरी जायचा, तिथे रहायचा. त्याने जानूबद्दल स्वत:च्या आई-वडिलांना काही सांगितले नव्हते” अशी माहिती योगी यांनी दिली.

जानू अचानक सोमवारी इन्साथच्या घरी गेली व त्याच्या आई-वडिलांसमोर हत्येची कबुली दिली. “दोन महिन्यांपूर्वी सात डिसेंबर २०१९ रोजी आमचे भांडण झाले. त्यानंतर मीच रशीने गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह माझ्या रुममध्ये पुरला असे तिने सांगितले. आपल्या मुलाचा मृत्यू झालाय हे त्याच्या आई-वडिलांना दोन महिन्यांपासूनच माहितच नव्हते.
इन्साथ रोज माझ्या स्वप्नात येतोय, त्यामुळे मी हत्येची कबुली देतेय असे तिने इन्साथच्या आई-वडिलांना सांगितले. त्याच्या आई-वडिलांनी सतनामधील राम नगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. जानूने पोलिसांसमोर मात्र पलटी मारली. इन्साथने स्वत: आत्महत्या केली. भितीपोटी आपण त्याचा मृतदेह पुरला असे सांगितले.