एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूचा सामना करत असताना भारताचा पारंपरिक शेजारी काश्मीर प्रश्नावरुन कुरापती काढत आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात पाकव्याप्त काश्मीर भागात करोनाविषयी मदतकार्यासाठी आलेल्या शाहिद आफ्रिदीने उपस्थित जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना आफ्रिदीने, सध्या संपूर्ण जग करोनाशी लढत आहे. मात्र मोदींच्या मनात यापेक्षाही घातक विष भरलेलं आहे असं वक्तव्य केलं.

यावेळी मोदींवर टीका करत असताना आफ्रिदी म्हणाला, “मोदी हे धर्माचं राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल उत्तर मोदींना द्यावं लागेल.” शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर भारतात त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी करोनाविरुद्ध लढ्यात गरीब व गरजूंच्या मदतीसाठी मैदानात आलेल्या आफ्रिदीचं सर्वत्र कौतुक होत होतं. भारताचे माजी खेळाडू हरभजन सिंह, युवराज सिंह यांनीही आफ्रिदीचं सोशल मीडियावरुन कौतुक करत त्याच्या संघटनेला अधिकाधीक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र भारतावर केलेल्या टिकेनंतर हरभजन सिंहनेही नाराजी व्यक्त केली आहे.

“शाहिद आफ्रिदीकडून अशा प्रकारचं वक्तव्य येणं हे खरंच दुर्दैवी आहे. आमच्या देशाविरोधात आणि पंतप्रधानांविरोधात वाईट बोललेलं कधीही खपवून घेतलं जाणार नाही. काही दिवसांपूर्वी त्याने आम्हाला चॅरिटीसाठी एक व्हिडीओ पाठवण्याची विनंती केली होती आणि सध्याची परिस्थिती पाहता माणुसकीच्या नात्यातून मी आणि युवराजने शाहिदच्या संस्थेला मदत करण्याचं आवाहन केलं. पण अशा प्रकारचं वक्तव्य करुन त्याने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढे माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही.” हरभजन सिंहने इंडिया टुडे शी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली.

“२० वर्ष मी माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व केलंय. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. त्यामुळे मी माझ्या देशाविरोधात काही केलंय असं बोलायचा कोणालाही अधिकार नाही. उद्या देशाला माझी गरज लागली तर बंदूक घेऊन मी सीमेवर जायलाही मागेपुढे पाहणार नाही.” आफ्रिदीला मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनावरुन हरभजनला चांगलच ट्रोल व्हावं लागलं होतं, ज्यावर त्याने आपलं स्पष्टीकरण दिलं. हरभजनव्यतिरीक्त गौतम गंभीरनेही आफ्रिदीच्या वक्तव्यावर टीका करत, काश्मीर पाकिस्तानला कधीच मिळणार नाही असं सुनावलं आहे.