दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेते जाहीर भाषणाची पातळी खालच्या स्तरावर नेत असून, महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या लोकांना असभ्यपणाचा अधिकार मिळालेला नाही, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.
आम आदमी पक्षाला दिल्लीत जो विजय मिळाला, त्यावरून असभ्यपणामुळे मते मिळतात असा काँग्रेस पक्षाचा गैरसमज झालेला दिसतो, असे दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या नेत्यांच्या कठोर टीकेचे लक्ष्य झालेले जेटली म्हणाले.
दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्ली विधानसभेत आणि बाहेरही पंतप्रधान व इतरांबाबत केलेल्या वक्तव्यांचे काय? भारतत सरकारच्या एखाद्या अधिकाऱ्याने अशी भाषा वापरली असतील, तर त्याला देशव्यापी उद्रेकाला तोंड द्यावे लागले असते, असेही मत जेटलींनी व्यक्त केले.
महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या लोकांनी संयम पाळणे अपेक्षित असते. ते विक्षिप्तपणे वागू शकत नाहीत. असभ्यपणा हा त्यांना मिळालेला अधिकार नाही. असभ्य भाषा वापरून जाहीर भाषणाची पातळी घसरवणे योग्य नाही. असभ्य ध्वन्यर्थ असलेले खोटे भाषण हे सत्याचा पर्याय ठरू शकत नाही, असे ‘असभ्यता हे भारतीय राजकारणाचे नवे परिमाण आहे काय?’, असा प्रश्न उपस्थित करताना जेटली यांनी फेसबुकवर म्हटले आहे.
‘असे नसल्याची मला आशा आहे’, असे केजरीवाल व ‘आप’च्या इतर नेत्यांविरुद्ध दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे अब्रुनुकसानीचे दावे दाखल केलेल्या जेटली यांनी या प्रश्नाला स्वत:च उत्तर देताना लिहिले आहे. भारतात जाहीर भाषणांचे स्वरूप असभ्य झाले असल्याचे जेटली यांनी बुधवारी एका भाषणात म्हटले होते. दिल्ली सरकारचे पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक यांनी राजकीय भाषणांची पातळी घसरवली आहे. नेमक्या बाबी कधीच न सांगता सर्वसाधारणपणे खोटेपणा करण्यावर त्यांचा भर असतो, असे जेटली म्हणाले. सीबीआयने दिल्लीच्या सचिवालयावर छापे घातल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन ‘भित्रे’ व ‘मनोरुग्ण’ असे केल्यामुळे वाद उद्भवला होता.