News Flash

स्काइपवरून या उच्चपदस्थानं दिला सौदी पत्रकाराच्या हत्येचा आदेश

सौद अल काहतानी या सौदी क्राऊन प्रिन्सच्या खास व्यक्तिचा पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत सहभाग

सौदी अरेबियाचे पत्रकार, वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक जमाल खाशोगी (एपी फोटो)

सौद अल काहतानी या सौदी क्राऊन प्रिन्सच्या खास व्यक्तिचा पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत सहभाग असल्याचं समोर आलं आहे. दोन तपास यंत्रणाच्या अहवालानुसार इस्तंबूलमध्ये सौदी दूतावासात खाशोगींच्या झालेल्या हत्येचा आदेश काहतानी यांनी स्काइपवरून दिला होता. काहतानी हे सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सचं सोशल मीडिया सांभाळतात. सौदीत शेकडोजणांच्या ज्या अटका झाल्या, त्यांच्यामागेही काहतानीच होते. लेबनॉनच्या पंतप्रधानांना स्थानबद्ध करण्यातही यांचाच हात होता.

शनिवारी सौदीच्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं की सौदीचे राजे सलमान यांनी खाशोगींच्या हत्येप्रकरणी काहतानी व अन्य चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे जाहीर केले आहे. परंतु गेल्या तीन वर्षांमध्ये काहतानींचं स्थान इतकं भक्कम झालं आहे की खाशोगींच्या हत्येचे ते सूत्रधार असूनही तसं घोषित केलं जात नाहीये. काहतानी यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं की साहेबांच्या म्हणजे क्राऊन प्रिन्सच्या आदेशाखेरीज ते काहीही करत नाहीत. मी एक चाकर असून जी आज्ञा दिली जाते तिचं मी पालन करतो असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवणं म्हणजे क्राउन प्रिन्सवर ठपका ठेवण्यासारखं आहे.

परंतु, सौदीच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी मात्र प्रिन्स मोहम्मद यांना या हत्येची कल्पना नव्हती आणि त्यांनी कुणाचं अपहरण करावं वा हत्या करावी असा आदेश दिला नव्हता असं म्हटलं आहे. अर्थात, टर्कीनं म्हटलंय की त्यांच्याकडे जे काही घडलं त्याचं ऑडियो रेकॉर्डिंग आहे आणि सौदी सांगतंय ते काही खरं नाही.

याआधीही सौदी सरकारच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्या असून त्यावेळी तरी सौदी सहीसलामत सुटलं होतं. गेल्याच वर्षी सौदीनं लेबनॉनचे पंतप्रधान साद अल हारीरी यांचं अपहरण केलं होतं. आठ जणांच्या सांगण्यानुसार हारीरी यांना शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. त्यावेळीही काहतानी यांचंच नाव पुढे आलं होतं. शेवटी फ्रान्सनं हस्तक्षेप केला आणि हारीरींची मुक्तता केली. परंतु, पाश्चात्य देशांनी सौदीला वेळीच लगाम घातला नाही आणि त्यांचं धाडस वाढल्याचं निरीक्षकांचं मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 2:11 pm

Web Title: he ordered killing of saudi journo khashogis killing over skype
Next Stories
1 रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मित्राच्या घरी न्याल? शबरीमला प्रवेशावर स्मृती इराणींचा प्रश्न
2 छत्तीसगढ निवडणूक : मुख्यमंत्री रमणसिंहांविरोधात काँग्रेसकडून अटलजींच्या पुतणीला तिकीट
3 हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल परकीय कसे ? – ओवेसी
Just Now!
X