शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा दोन दहशतवाद्यांनी उधमपूरमध्ये लष्करी वाहनावर हल्ला करताच बीएसएफचा शूर जवान रॉकी याने त्याचे ४० गोळ्यांचे पूर्ण मॅगझिन त्यांच्यावर रिकामे केले. स्वत:च्या प्राणांचे बलिदान देऊन त्याने दाखवलेल्या या शौर्यामुळे नि:शस्त्र असलेल्या त्याच्या ४४ सहकाऱ्यांचे प्राण वाचले.
सैन्याची अतिरिक्त कुमक २० मिनिटांनंतर घटनास्थळी पोहचली, तोपर्यंत या २५ वर्षांच्या जवानाने दहशतवाद्यांना गोळीबारात गुंतवून ठेवले आणि जवानांनी भरलेल्या या बसमध्ये हातबाँब फेकण्याची त्यांना संधीच दिली नाही, असे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांपैकी एक दहशतवादी जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला नंतर पकडण्यात आले.
बस पुढे जाऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी तिचे टायर्स पंक्चर करण्यासाठी केलेल्या हल्ल्यात बसचा चालक व रॉकीचा सहकारी शुभेंदु रॉय गोळी लागून मरण पावला.
बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉकीच्या शौर्याची प्रशंसा केली, मात्र हरयाणातील त्याच्या गावात दु:खाची छाया पसरली होती. दहशतवादी हल्ल्यात रॉकी शहीद झाल्याची बातमी यमुनानगर जिल्ह्य़ातील रामगड माजरा खेडय़ात पोहचली, तेव्हा तेथील जनजीवन ठप्प झाले.
जेमतेम दोन आठवडय़ांपूर्वी माझा मुलगा कुटुंबीयांसोबत होता. त्याच्या बाबतीत असे काही होईल, असे मला अजिबात वाटले नव्हते, असे रॉकीचे वडील प्रीतपाल म्हणाले. मात्र, देशासाठी आपले प्राण देणाऱ्या मुलाबद्दल माझ्या गावाला तसेच संपूर्ण देशाला अभिमान वाटतो,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.