दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने आणि मुलीने आम आदमी पार्टीला मतदान करण्यासाठी दिल्लीच्या मतदारांना भावनिक आवाहन केले आहे तसेच लोकांसाठी काम करणे, सर्वांना शिक्षणाची सुविधा देणे आणि भगवद गीतेचे पठण करणे याला दहशतवाद म्हणणार का? असा सवालही विचारला आहे.

शिक्षण आणि आरोग्याची सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करुन देणे दहशतवाद आहे का? लोकांसाठी काम करणं दहशतवाद आहे का? माझे वडिल मला आणि माझ्या भावाला भगवद गीतेची शिकवण द्यायचे. हा दहशतवाद आहे? असा सवाल हर्षिता केजरीवालने विचारला आहे. ती अरविंद केजरीवाल यांची मुलगी आहे.

“आमच्यावर काय आरोप केले जातायत ते लोक पाहतायत. पण ‘झाडू’लाच मतदान करणार हे लोकांनी आम्हाला आश्वस्त केले आहे. इतकी मेहनत करणाऱ्या माणसावर आरोप केले जातायत ते पाहून वाईट वाटते” असे सुनिता केजरीवाल म्हणाल्या. भाजपाने केजरीवालांवर दहशतवादी असण्याचा आरोप केला. त्याबद्दल सुनिता केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली. “आम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते. विरोधी पक्षातले काही लोक त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप करतायत ते पाहून वाईट वाटते” असे सुनिता केजरीवाल म्हणाल्या.