जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पत्र ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सल्ला बिरजू असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या कृत्याची कबुलीही दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सल्ला बिरजू याच्यावर हवाई प्रवासासाठी बंदी घालण्याचे आदेश सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत. तसेच या व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.

सल्ला बिरजू याने मुंबई-दिल्ली प्रवास करताना विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारे पत्र मागे सोडले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. बिरजू जेट एअरवेजच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. त्याने विमानातील स्वच्छतागृहात धमकीचे पत्र ठेवले होते. उर्दू आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पत्र होते. विमानातील क्रू मेंबरला हा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेने विमानाचे तातडीने अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले होते. त्यानंतर विमानातील ११५ प्रवाशी आणि ७ क्रू मेंबर्सना तातडीने सुरक्षित विमानाबाहेर काढण्यात आले होते. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत सरकारने पहिल्यांदाच एखाद्या प्रवाशाचे नाव ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष गोष्ट म्हणजे सल्ला बिरजू याने चौकशीदरम्यान आपले जेट एअरवेजच्या एका महिला कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले. यापूर्वी जुलै महिन्यात जेवणात झुरळ सापडल्याचे सांगत त्याने जेट एअरवेजच्याच विमानात गोंधळ घातला होता, अशी माहिती प्रशासनाने दिली. भविष्यात सल्ला बिरजूवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी बंदी घातली जाण्याचीही शक्यता आहे.