राजधानी दिल्लीमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलाने बारावी सीबीएससी परीक्षेत ९१.७ टक्के गुण मिळवले आहेत. दोन वेळचं जेवणही त्याला मिळत नव्हते पण जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दिल्लीच्या परमेश्वर या मुलानं बारावीत उज्वल यश मिळवलं आहे. परमेश्वरच्या या यशानं कुटुंबाचं नाव मोठं झालं आहे.

दिल्लीच्या तिगरी या झोपडपट्टीत दोन खोल्यात परमेश्वर आपल्या कुटुंबातील नऊ सदस्यांबरोबर राहतोय. १७ वर्षीय परमेश्वर याचा संघर्ष खूप मोठा आहे. शिकण्यासाठी त्यानं स्वत:च पैसा उभारला आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी परमेश्वर याने खानपूर येथे गाड्या धुवायला सुरुवात केली होती. दररोज दोन ते तीन तासांत दहा-पंधरा गाड्या धुवायचा. याचं महिन्याला तीन हजार रुपये मिळाये. याच पैशातून परमेश्वरने पुस्तके आणि कपडे खरेदी केली.

आणखी वाचा- दिवसा पोलिसाचे कर्तव्य, तर रात्री शिक्षकाचीही भूमिका

दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही परमेश्वर पहाटे चार वाजता उठायचा अन् अर्धा तास चालत कामावर जायचा. आठवड्यातून सहा दिवस परमेश्वर गाड्या धुण्याचं काम करत होता. आज त्याच्या कष्टाचं चीज झालं आहे.

आणखी वाचा- १०० रुपयांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी हातगाडी पलटी केलेल्या ‘त्या’ मुलाला मदतीचा ओघ; घर आणि शिक्षणाची सुविधा

परमेश्वर म्हणतो की, ‘मला शिकण्यासाठी नोकरीची खूप गरज होती. कारण ६२ वर्षीय वडीलांना सतत आजारी असतात. मोठा भाऊ नोकरी करतो. त्याच्या पैशातून घराचा सर्व खर्च भागतो. अशा परिस्थिती मी त्यांच्यावर कसा बोज होईल. त्यामुळे गाड्या धुण्याचं काम सुरु केलं.’