देशातील कोविड १९ साठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये आतापर्यं १ लाख ७३ हजार आयसोलेशन बेड तयार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याव्यतरिक्त २१ हजार ८०० आयसीयू बेडही तयार करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाच्या रूग्णांचा वाढण्याचा दर हा सरासरीपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ३ लाख १९ हजार ४०० करोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
दर घटला
करोना रुग्णांची संख्या १००७ ने वाढून १३, ३८७ इतकी झाली आहे. तर २४ तासात करोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात करोना रुग्णांच्या वाढीच्या दरात घट झाली आहे. आपण करोनाशी कसोशीने लढा देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येत ४० टक्के घट, आरोग्य मंत्रालयाची माहिती
एप्रिल महिन्यात प्रमाण कमी
१५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे तरीही करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 5:23 pm