केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कफ व खोकल्याच्या काही औषधांसह एकूण ३४४ औषधांवर बंदी घातली असून मानवास हानिकारक असलेली अशी ही औषधे आहेत व त्यांना पर्यायी सुरक्षित औषधे उपलब्ध आहेत. या औषधांवरची बंदी लागू करण्यात आली असून त्याबाबत अधिसूचना लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईनंतर पीफायजर कंपनीच्या शेअरचा भाव ९ टक्क्य़ांनी कमी झाला आहे.
देशातील ख्यातनाम वैज्ञानिकांशी या औषधांच्या अनिष्ट परिणामांबाबत चर्चा करूनच सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. ३४४ कंपन्यांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कंपन्यांनी प्रतिसाद देण्याची तसदीही घेतलेली नाही, प्रत्येकाला संधी दिली होती पण त्यांनी स्पष्टीकरणे केली नाहीत त्यामुळे बंदी लागू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
बंदी घातलेल्या ३४४ औषधांमध्ये क्लोफेनीरॅमाईन मॅलेट व कोडीन सिरपचा समावेश आहे. त्यांची विक्री कोरेक्स नावाने सुरू आहे. सरकारने पीफायजर कंपनीला दणका दिला असून कोरेक्सची विक्री थांबवण्यास सांगितले आहे.
१० मार्च २०१६ रोजी ही अधिसूचना काढली असून त्यात या दोन्ही औषधांवर बंदी घातली आहे. पीफायजर कंपनीने औषधाचे उत्पादन व विक्री बंद केली आहे.

विक्री थांबवली
दरम्यान, पीफायजर व अबॉट या कंपन्यांनी कोरेक्स व फेनसेडील औषधांची विक्री बंद केली आहे. असे असले तरी दोन्ही कंपन्यांनी बंदी उठवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला आहे.
न्यायालयाची स्थगिती
दिल्ली उच्च न्यायालयाने पीफायजरच्या कोरेक्स सिरपवरच्या बंदीस तात्पुरती स्थगिती दिली आहे, सरकारने कंपनीची गळचेपी करू नये असे न्यायालयाने सांगितले. न्या. राजीव सहाय एंडलॉ यांनी सांगितले की, कंपनीच्या माहितीनुसार गेली २५ वर्षे कोरेक्स हे कफ सिरप विकले जात आहे. याबाबत तज्ज्ञ समितीने काय शिफारशी केल्या आहेत त्याबाबत सरकारने स्थितीदर्शक अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.