करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून करोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही.
तेलंगणमधील सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण विभागाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, “१९ जानेवारीला या आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता”.
“प्राथमिकदृष्ट्या हा मृत्यू करोना लसीकरणाशी संबंधित नसल्याचं दिसत आहे. गाईडलाइन्सनुसार, शवविच्छेदन डॉक्टरांच्या टीमकडून केलं जाईल,” अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण विभागाने निवदेन प्रसिद्ध करत दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही दोन्ही वेळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळली होती. १६ जानेवारीपासून देशभरात करोना लसीकरण मोहीम सुरु झाली असून एकूण तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील योद्ध्यांना लस दिली जाणार आहे.
पहिला मृत्यू मुरादाबाद येथील सरकारी रुग्णालयात झाला होता. वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या ५२ वर्षीय महिपाल सिंह यांचा लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या प्रकरणात कर्नाटकमधील बेल्लारी येथील राज्याच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या ४३ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना लस देण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 5:08 pm