दिल्ली हायकोर्टाने सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला 7 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. सुनंदा पुष्कर यांचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरूर हेदेखील कोर्टात हजर होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांना आरोपी करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 10 दिवसांची मुदत मागितली. त्यामुळे कोर्टाने 7 मार्चपर्यंत या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. दरम्यान थरुर यांचे वकील विकास पाहवा यांनी या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील हॉटेल लीलामधील रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. घटनेच्याच रात्री तपासासाठी या रुमला टाळे ठोकण्यात आले होते.