देशभरातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी करणार आहे.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील अलख श्रीवास्तव यांनी याचिकेवर तातडीने सुनावणीची विनंती केली असता, न्या. दीपक गुप्ता व न्या. सूर्य कांत यांच्या सुट्टीतील खंडपीठाने हे प्रकरण मंगळवारी सुनावणीला घेण्याचे मान्य केले.

कोलकात्याच्या एका रुग्णालयात १० जून रोजी रुग्ण मरण पावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांवर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. यानंतर पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे. डॉक्टरांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सरकारने नियुक्त केलेले सुरक्षा कर्मचारी नेमण्याचे निर्देश केंद्राच्या आणि पश्चिम बंगालच्या गृह व आरोग्य मंत्रालयांना द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

कोलकात्यातील एनआरएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये निष्ठ डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला द्यावे, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

वरिष्ठ डॉक्टरांच्या पदत्यागाचा उल्लेख

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवा कोलमडल्या असून, डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. आयएमएने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, शुक्रवारी निदर्शने करण्याचा, तसेच काळ्या फिती लावण्याचा आदेश सदस्यांना दिला आहे. आंदोलनकर्त्यां डॉक्टरांसोबत एकजूट दर्शवण्यासाठी अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांची सरकारी पदे सोडली आहेत, याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.