उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या आलेली उष्णतेची लाट येत्या २४ तासांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने बुधवारी सांगितले. दरम्यान, आग्नेय मोसमी वाऱ्यांनी बंगालच्या उपसागरात आणखी पुढे मार्गक्रमण केले आहे.

उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे.‘वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची ही परिस्थिती राहील आणि विदर्भ आणि पश्चिम राजस्थान या भागांमध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र उष्णतेची लाट येईल,’ असे हवामान खात्याने सांगितले.