देशात सध्या करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लस विकसित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु करोनावरील लस येणार कधी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज राज्यसभेत याबाबत माहिती दिली. तसंच गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकार करोनाच्या विरोधात लढाई लढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एक होऊन ही लढाई लढत आहे. ७ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनमध्ये करोनाचा रूग्ण सापडल्याची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३०० दशलक्ष करोनाचे रुग्ण आणि ५-६ दशलक्ष मृत्यू होतील असं सांगण्यात आलं होतं. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपण दररोज ११ लाख चाचण्या करत आहोत. आपल्यापेक्षा अधिक चाचण्या केवळ अमेरिकेनं केल्या आहे. आपण लवकरच अमेरिकेला चाचण्यांमध्ये मागे टाकू,” असं हर्ष वर्धन म्हणाले.

“करोनाच्या विषयात सरकारनं कोणताही उशिर केला नाही. ७ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाबाबत माहिती मिळाली आणि ८ तारखेपासून आम्ही बैठक सुरू केली. ८ महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवलं. त्यांनी सर्वांचे सल्ले घेतले ही बाब इतिहासाल कायम राहिल,” असंही त्यांनी नमूद केलं. करोना महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत. तसंच इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर कमी आहे. सरकारला कोविडचे नवे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंना आळा घालण्यात यश मिळाल्याचंही हर्ष वर्धन म्हणाले.

कधी येणार लस ?

अन्य देशांप्रमाणे भारतही लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा एक गट यावर लक्ष ठेवून आहे आणि आमच्याकडे पुढील योजनाही तयार आहेत. पुढील वर्षाच्या सुरूवातीच्या कालावधीत भारतात लस उपलब्ध होण्याची आम्हाला आशा आहे, असं हर्ष वर्धन यांनी नमूद केलं.