जगातील सर्वात लठ्ठ मुलाचं राजधानी दिल्लीतील एका रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं आहे. १४ वर्षीय मिहिर जैनचं वजन २३७ किलो होते. वजनामुळे त्याला एका जागी उभं राहणंही अवघड जात होतं. घरात असतानाही आपण झोपलेल्या अवस्थेतच असायचो अशी माहिती मिहिरने दिली आहे. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वीपणे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

रुग्णालयातील वरिष्ठ बेरिएट्रिक सर्जन प्रदीप चौबे आणि त्यांच्या टीमने हे ऑपरेशन केलं. मिहिरच्या हाडांवर ० ते १२ इंच चरबी जमा झाली होती, ज्यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन करताना अनेक समस्या येत होत्या. जवळपास अडीच तास चाललेल्या ऑपरेशनदरम्यान मिहिरवर गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्यात आली. याआधी जेव्हा मिहिरचे आई-वडिल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते तेव्हा त्यांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला होता. त्यावेळी मिहिरला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. एका महिन्यात मिहिरने १० वजन कमी केलं होतं.

मिहिरचा जन्म नोव्हेंबर २००३ मध्ये झाला. जन्मावेळीच त्याचं वजन अडीच किलो होतं. वयाच्या पाचव्या वर्षीच मिहिरचं वजन ६० ते ७० किलोपर्यंत पोहोचलं होतं. वजन जास्त असल्या कारणाने मिहिरला चालायला आणि बसायलाही जमत नव्हतं. ज्यामळे त्याला आपली शाळा सोडावी लागली. मिहिरच्या कुटुंबियांनी २०१० मध्येच डॉक्टरांशी संपर्क साधला होता. पण वय कमी असल्याने डॉक्टरांनी सर्जरी करण्यास नकार दिला होता. यानंतर जेव्हा त्यांनी भेट घेतली तेव्हा वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला.

मिहिरला पिझ्झा आणि पास्ता प्रचंड आवडतो. पण डॉक्टरांनी त्याला सक्त डाएट फॉलो करण्यास सांगितलं होतं. ऑपरेशन नंतरही हा डाएट फॉलो करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तंदरुस्त राहायचं असल्यास जंक फूड पूर्णपणे टाळलं पाहिजे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. आठवड्याभरानंतर मिहिरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.