जम्मू काश्मिरमधील अर्निया या सीमावर्ती भागात घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांशी गुरूवारी झालेल्या जोरदार चकमकीत भारतीय सैन्यदलाचा एक जवान आणि तीन स्थानिक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. या चकमकीत सुरक्षा दलाचे अन्य तीन जवानही जखमी झाले आहेत. तर, प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर पिंडी खटार या गावातील भारतीय लष्कराच्या वापरात नसलेल्या एका बंकरवर कब्जा केला आणि त्याठिकाणी असलेल्या शस्त्रसामुग्रीचा वापर भारतीय सैन्याविरूद्ध केला. 
arnia-canvaतत्पूर्वी गुरूवारी सकाळी दहशतवादी दृष्टीस पडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांना खबर दिली. या दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचीही मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराकडून या संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ठाम पवित्रा घेतला होता. तसेच उद्या जम्मू-काश्मिरमध्ये मोदी यांच्या निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम आखण्यात आला होता.
सूत्रांच्या माहितीनूसार, सीमारेषा ओलांडून हे आत्मघातकी पथक तब्बल दोन किलोमीटर आत भारताच्या हद्दीत शिरले होते. त्यानंतर पिंढी काठर गावात लष्कराच्या बंकरमध्ये शिरण्यापूर्वी दहशतवाद्यांनी तीन भारतीय जवानांवर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर लष्कराकडून प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. मात्र, यावेळी जखमी झालेला एक जवान आणि नागरिकाचाही नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.     
पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबाराचा फायदा घेत या दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास भारतीय क्षेत्रामध्ये घुसखोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानी सैन्याकडून या भागात कमी- अधिक प्रमाणात गोळीबार करण्यात येत आहे.