ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या निधनानंतर दक्षिण लंडनमधील ब्रिक्स्टन येथे मुख्य चौकात शेकडो लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. १९८०च्या दंगलीत हा भाग होरपळला गेला होता व त्यामुळे या लोकांची थॅचर यांच्यावर नाराजी होती. थॅचर यांच्यावर काही लोकांचे कमालीचे प्रेम होते व काही लोक त्यांचा कमालीचा तिरस्कार करीत असत.
‘थॅचर यांच्या निधनामुळे आनंद साजरा करा’ असे फलक या लोकांच्या हातात होते. पर्यायी संस्कृतीचे प्रमुख केंद्र असलेल्या ब्रिक्स्टन येथे थॅचर यांच्या निधनानंतर सुमारे दोनशे लोकांनी चक्क उत्सव साजरा केला. त्यांनी पेयपान केले, नृत्य केले, गाणी लावली.१९९० मध्ये थॅचर यांनी राजीनामा दिला तेव्हाचे वृत्तपत्र फडकावत एकाने सांगितले, की मला अतिशय आनंद झाला. थॅचरबाईंनी या देशाचे फार मोठे नुकसान केले होते. काहींनी पदपथावर येऊन आनंद व्यक्त केला. क्लेअर ट्रस्कॉट यांनी सांगितले, की ती चेटकीण मरण पावली याचा आम्हाला आनंद आहे. मी उत्तर लंडनची रहिवासी आहे. तिथे नोकऱ्या नाहीत व हा थॅचर यांच्या धोरणाचा परिणाम आहे.मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८१मध्ये ब्रिक्स्टन येथे मोठय़ा प्रमाणात दंगली झाल्या होत्या. कॅरोल कूपर यांनी सांगितले, की थॅचर यांचा मृत्यू साजरा करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. बिअर पिता पिता या महिलेने सांगितले, की थॅचर यांचा मृत्यू झाला याचे विशेष काहीच नाही, पण त्यांनी या देशात जी धोरणे राबवली ती फार चुकीची होती. स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातही तीनशे जणांनी उत्सव केला. मॅगी, मॅगी, मॅगी .. डेड, डेड, डेड अशा आरोळय़ा ठोकण्यात आल्या.
६ पोलीस जखमी
थॅचरविरोधकांना हटविण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू करताच जमावाने त्यांच्यावर बाटल्या भिरकावल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होऊन सहा पोलीस जखमी झाले. एका पोलिसाला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. निदर्शकांना अटक झाली आहे.
थॅचर यांचा दफनविधी १७ एप्रिलला
लंडन : ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान आणि ‘पोलादी स्त्री’ म्हणून ओळखल्या गेलेल्या कणखर नेत्या मार्गारेट थॅचर यांचा अंत्यविधी १७ एप्रिलला लष्करी इतमामात होणार आहे. १९७९ ते १९९० अशी ११ वर्षे ब्रिटनची सत्तासूत्रे समर्थपणे पेलून सर्वाधिक काळ पंतप्रधानपद सांभाळलेल्या त्या ब्रिटनच्या एकमेव नेत्या ठरल्या आहेत. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने मंगळवारी मध्यरात्री मध्य लंडनमधील रिट्झ हॉटेलात त्यांचा मृत्यू ओढवला होता. या हॉटेलातून त्यांचा मृतदेह असलेली शवपेटिका मंगळवारी हलविण्यात आली. ख्रिस्मसपासूनच त्या रुग्णाईत असून बेल्ग्रेव्हिया येथील घराऐवजी पिकाडिलीतील रिट्झ हॉटेलात वास्तव्यास येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. येथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होत्या.