जम्मू- काश्मीरच्या पूंछ व राजौरी जिल्ह्य़ांमध्ये नियंत्रण रेषेवरील सीमा चौक्यांवर आणि खेडय़ांवर पाकिस्तानी लष्कराने केलेला जोरदार गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा यामुळे किमान १६ जनावरे ठार झाली.

सीमेपलीकडून होत असलेल्या जोरदार गोळीबारामुळे पूंछ जिल्ह्य़ात गोळीबाराच्या कक्षेत येणाऱ्या किमान ६ सरकारी शाळा शनिवारी सोडून देण्यात लागल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

पाकिस्तानने राजौरीतील नौशेरा सेक्टर, मेंढरचा बालाकोट भाग, तसेच पूंछ जिल्ह्य़ातील शाहपूर व केरनी सेक्टरला लक्ष्य करत विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराने याचे चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण खात्याच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

पाकिस्तानने सर्वप्रथम शुक्रवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचा भंग केला आणि त्यानंतर रात्री पावणेअकरा ते मध्यरात्री २ या वेळेत पूंछ जिल्ह्य़ाच्य मेंढर सेक्टरमधील बालाकोट भागात लहान शस्त्रांनी गोळीबार केला, तसेच तोफगोळे डागले. यानंतर शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पाकने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करून पूंछ जिल्ह्य़ातील शाहपूर व केरनी सेक्टरला लक्ष्य केले, अशी माहिती या प्रवक्त्याने दिली. अखेरचे वृत्त हाती आले, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता.

बालाकोट भागात पाकिस्तानकडून रात्रभर सुरू असलेल्या गोळीबारात १६ पाळीव जनावरे मरण पावल्याचे पूंछचे उपायुक्त राहुल यादव यांनी सांगितले. या परिसरात तोफांचे न फुटलेले गोळे पडून आहेत.