हैदराबादमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सांयकाळी झालेल्या या पावसामुळे शहरातील विविध भागातील घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांयकाळी ४.३० ते ८.३० च्या सुमारास सुमारे ६७.६ मिमी. इतका विक्रमी पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. शहरातील वाहतूक मंदगतीने सुरू होती. हैदराबाद महानगरपालिकेचे कर्मचारी शहरात जमा झालेले पाणी काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसले.

नायडू नगर येथील घराची भिंत अंगावर पडून ४ महिन्याच्या चिमुकल्याची व त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना ही रस्त्याच्या कडेला विद्युत खांबाला चिटकून लावण्यात आलेल्या कारला हात लावल्यामुळे विजेचा धक्का बसून एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
वादळी पावसामुळे पुढील सरकारी आदेश येईपर्यंत उस्मानिया विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.