आणखी दोन दिवस जोर कायम; मात्र मान्सूनची प्रतीक्षाच

केरळच्या दक्षिण भागातील जिल्हय़ांसह तामिळनाडूतील काही भागांत सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे किनारपट्टीच्या भागांत मोठे नुकसान झाले असून, तिरुअनंतपूरमच्या किनारी भागात अनेक घरांची पडझड झाली. अलापुझ्झा, एर्नाकुलम या जिल्हय़ांनाही मोठा फटका बसला आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असून पुनर्वसन छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा हा परिणाम असून मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.

केरळमधील वलियाथुरा, अदिलाथुरा व चेरियाथुरा येथील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये १९ मे च्या सकाळपर्यंत एक ते दोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चेन्नईमध्ये सोमवारी सकाळी ८.३० पासून मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत ६७ मिमी पावसाची नोंद झाली. २०१०नंतर मेमध्ये चेन्नईत पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

सध्याचा पाऊस हा नर्ऋत्य मान्सूनचा नसून, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा हा परिणाम आहे, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी पावसामुळे संभाव्य हानीची शक्यता गृहीत धरून उपाययोजना कराव्यात. पुढील एक-दोन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.