देशाच्या उत्तरेकडील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून त्यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी कडे, दरडी कोसळण्याच्या घटनांबरोबरच घरेही जमीनदोस्त झाल्याचे वृत्त आहे. अनेक नद्यांचे पाणीही धोक्याच्या रेषेपर्यंत आले आहे.
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्य़ात मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराखाली सहा जण, तर काश्मीरमध्ये दरड कोसळून दोघे जण ठार झाले. उत्तर प्रदेशातील नद्याही भरून वाहू लागल्या आहेत. उत्तराखंडात पावसाच्या तडाख्याने एक रेस्टॉरण्ट कोसळून त्याखाली एक बांधकाम मजूर ठार, तर अन्य तिघे जण जखमी झाले. राजधानीतही सलग चौथ्या दिवशी पावसाचे सत्र सुरू असल्यामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साठल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. आयटीओ, विकास मार्ग, साऊथ एक्स्टेन्शन, खानपूर, महिपालनगर, आयआयटी क्रॉसिंग, नेहरू प्लेस आदी भागांतील रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ६८.६ मिमी पाऊस पडल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शनिवापर्यंत दिल्लीत १४७.८ मिमी पाऊस पडला. या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस होता.
दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे स्थगित ठेवण्यात आली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे.हिमाचल प्रदेशातील रावी, बियास आणि सतलज नद्यांना पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे.
गुजरातेत १० सिंहांचा मृत्यू
गुजरातेत अलीकडेच आलेल्या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला असतानाच या पुरामध्ये १० सिंह, १,६००नीलगाई व ठिपके असलेली ९० हरणे व इतर वन्य प्राणी मृत्युमुखी पडले आहेत.