फिरोझपूर जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा; मदत पथके तैनात

पाकिस्तानने भारतीय क्षेत्रात पाणी सोडल्यामुळे सतलज नदीच्या पाणलोट क्षेत्रातील एका बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर पंजाबच्या सीमेवरील फिरोझपूर जिल्ह्य़ात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

फिरोझपूर जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, काही खेडय़ांना पुराचा असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि लष्करांच्या चमूंना खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आले आहे.

पाकिस्तानने फार मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे तेंडीवाला खेडय़ातील बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, काही खेडय़ांमध्ये पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे, असे पंजाब सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा उपाय म्हणून सतलज नदीच्या काठावरील सर्वाधिक संवेदनशील खेडी रिकामी करण्याचा आदेश दिला आहे, तसेच आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाचे लोक तैनात केले आहेत, असे हा प्रवक्ता म्हणाला.

भारत-पाकिस्तान सीमेवरील खेडय़ातील बंधाऱ्याच्या मजबुतीसाठी लष्करासोबत संयुक्त कृती आराखडा तयार करावा, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी जल संसाधन विभागाला सांगितले आहे. याशिवाय, पुरामुळे उद्भवणाऱ्या कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी फिरोझपूरच्या उपायुक्तांना दिले आहेत.