मुसळधार पाऊस आणि तुफान बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागात भारतीय लष्कराच्या जवानांनी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. काश्मीर खोऱ्यातील पांजीपोरा परिसरात राष्ट्रीय रायफल्सचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तसेच रहिवासी वस्त्यांजवळील नाल्यांचा प्रवाह बदलण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

काश्मीर खोऱ्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. झेलम आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्याच्या प्रशासनाने गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील सर्व शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे खोऱ्यातील झरे, नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूरनियंत्रक विभागाने झरे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना २४ तास तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बचाव पथके पूरग्रस्त भागांत मदत आणि बचावकार्यासाठी पोहोचली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी दुपारनंतर बर्फवृष्टी आणि पावसाचा जोर ओसरेल आणि शुक्रवारी हवामानात बदल होईल, असा अंदाज राज्याच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. चिंतेचे कोणतेही कारण नसून सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी साचल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागेल, असेही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, झेलम आणि तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झेलम नदीच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ होताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही तासांत पाणीपातळीत होणाऱ्या वाढीचा वेग काही प्रमाणात मंदावलेला आहे.