पाटणा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून त्यामुळे शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचल्याने सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरांत रविवारी रात्रीपासून १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले आणि नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली, असे पाटणा महापालिका आयुक्त अभिषेक सिंह यांनी सांगितले. गरदानीबाग, पटेलनगर, राजवंशीनगर, अदालतगंज, कंकेरबाग आणि राजेंद्रनगर या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडील ३७ पंपांचा वापर सुरू करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.