उत्तराखंडमध्ये पावसाने जोर धरला असून बद्रीनाथ यात्रा विस्कळीत झाली आहे. हिमालयातील बद्रीनाथकडे जाणारा मार्ग दरडी कोसळल्याने बंद झाला आहे. डोंगरावरून पावसाने दरडी कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला असून ढगफुटी झालेले पिठोरगड, उत्तरकाशी, चमोली, रूद्रप्रयाग जिल्ह्य़ात आणखी पाऊस, पूर, दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

येत्या चोवीस तासांत या भागात सतर्कता बाळगण्याची गरज आहे, येत्या काही तासांत पूर, ढगफुटी व भूस्खलनाची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे असे हवामान विभागाचे संचालक विक्रम सिंग यांनी सांगितले. चारधाम यात्रा करणाऱ्यांनी हवामान खराब असल्याने पुढे जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. काल रात्री पुन्हा जोरदार पाऊस चालू झाला असून हृषीकेश-बद्रीनाथ मार्ग बंद झाला आहे.

जोशीमठ व बद्रीनाथ दरम्यान लांबागड येथे तसेच चमोलीनजीक नैथाना येथे दरडी कोसळल्या आहेत. चमोली प्रशासनानेही यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. चमोली जिल्ह्य़ात पुन्हा पावसाने घाटाच्या भागातील लोकांना पुराचा धोका आहे. १ जुलैला पुरात तेथे चार जण वाहून गेले होते व चाळीस खेडय़ांचा संपर्क तुटला होता. नैनीताल जिल्ह्य़ात हल्दवानी येथे १०० मि.मी. पाऊस झाला असून मसुरीत ९६, श्रीनगर ८२.२, डेहराडून ७४.८, उखीमठ ६६.३, नैनीताल ५६ तर हरिद्वार येथे ५३ मि.मी. पाऊस झाला आहे. डेहराडून येथे हवामान संचालकांनी सांगितले, की १८ जुलैनंतर हवामानात सुधारणा होईल व पाऊस थांबवण्याची शक्यता आहे. हृषीकेश येथे पावसाने गंगेला पूर आला आहे.