गुजरातमध्ये मुसळधार पावसाने आतापर्यंत २२ बळी घेतले असून तेथे मदतकार्य हाती घेण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचे जवळपास ३०० कर्मचारी आणि तीन हेलिकॉप्टर पाठविली आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी सकाळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन या वेळी गृहमंत्र्यांनी पटेल यांना दिले. एनडीआरएफची सात पथके मदतकार्यासाठी यापूर्वीच पाठविण्यात आली असून पुण्याहून आणखी चार पथके पाठविण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाची दोन आणि सीमा सुरक्षा दलाचे एक हेलिकॉप्टरही रवाना करण्यात आले आहे.
केंद्र सरकार गुजरात आणि देशाच्या अन्य भागांतील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये वादळात शेकडो बेघर, नऊ जखमी
कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये काल रात्रीपासून वादळ आले असून अनेक लोक बेघर झाले तर नऊ जण जखमी झाले, अनेक घरे या वादळात जमीनदोस्त झाली असे वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून आलेल्या वृत्तात म्हटले आहे. हावडा जिल्ह्य़ात १०० घरे कोसळली असून उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ात अनेक झोपडय़ा उडून गेल्या. नडिया जिल्ह्य़ात कच्ची घरे कोसळली. हावडा जिल्ह्य़ात चारा पांचला बदामताला खेडय़ात घरे कोसळून २०० लोक बेघर झाले आहेत. चक्रीवादळानंतर जोरात पाऊस झाला. त्यात ८० घरे कोसळली तर नऊ जण जखमी झाले, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही घरांचे पत्रे एक कि.मी. लांब उडत गेले. काही लोकांनी बांधकाम सुरू असलेल्या वस्तीगृहात आसरा घेतला आहे. २४ परगणा जिल्ह्य़ात २०० झोपडय़ांचे नुकसान झाले आहे.