भारताचे गव्हाचे कोठार मानल्या जाणाऱ्या पंजाब व हरयाणात आज अवकाळी पाऊस झाल्याने तेथील गहू उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता कर्नाल येथील गहू संशोधन संचालनालयाने वर्तवली आहे.
आताच्या स्थितीत पाऊस पडणे अपेक्षित नव्हते, तो गव्हाच्या पिकासाठी चांगला नाही. गव्हाला कोरडे व सूर्यप्रकाशित हवामान आवश्यक आहे तरच गव्हाचे दाणे भरू शकतात पण सततच्या पावसाने पिकाची उत्पादनक्षमता घसरण्याची शक्यता आहे, असे प्रकल्प संचालक इंदू शर्मा यांनी सांगितले.
सध्या गव्हाच्या पिकात दाणे भरण्याची प्रक्रिया चालू असताना पाऊस व कमी तापमानामुळे त्याला फटका बसू शकतो. दाणे भरण्यासाठी प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया वेगाने होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पाणी साठू देऊ नये व आणखी वरून पाणी देण्याचे टाळावे, असे आवाहन शर्मा यांनी केले.