तामिळनाडूला बसलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यातील मृतांची संख्या आता ७९ वर पोहोचली आहे. राज्यातील तीन जिल्ह्य़ांतून मंगळवारी आणखी आठ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त हाती आले आहे. येत्या एक-दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.विलूपुरम, वेल्लोर आणि कांचीपुरम जिल्ह्य़ात विजेचा धक्का लागून, भिंत कोसळून आणि बुडून आठ जण मरण पावले. सोमवार सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरू लागला आहे.
कमी दाबाचा पट्टा आता आंध्र प्रदेशकडे सरकल्याने तामिळनाडूत पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांचीपुरम जिल्ह्य़ात लष्कर आणि हवाई दलास पाचारण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोदल आणि तटरक्षक दलही मदतकार्य करीत आहे. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत ५०० किलो पाव आणि बिस्किटे यांचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मदतकार्य पथकाला सहकार्य करण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तंबारम येथील स्थिती अत्यंत नाजूक असल्याने पाणबुडे, पट्टीचे पोहणारे यांची पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.

तिन्ही सैन्यदले चेन्नईकरांच्या मदतीला; २२ जणांची सुटका
वादळी पावसामुळे दैना उडालेल्या चेन्नईकरांच्या मदतीसाठी भारतीय सैन्यदलांनी मदतकार्य सुरू केले असून हवाईमार्गे अन्न व पाणीपुरवठा केला जात आहे. बहुतांश भाग पाण्याखाली गेलेल्या तांबाराम या चेन्नईच्या उपनगरात अडकून पडलेल्या २२ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली. तर तटरक्षक दलाने आपली हेलिकॉप्टर्स मदतीसाठी तैनात केली आहेत.
चेन्नईला तुफान झोडपून काढणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली असली तरी काठोकाठ भरून वाहणाऱ्या जलाशयांमुळे तांबारामचा अधिकांश भाग पाण्याखाली गेला आहे. मुदीचूरमधील तलावांचे पाणी तांबाराममध्ये शिरल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराने चार, मद्रास रेजिमेंटचे जवान तैनात केले आहेत. तसेच भारतीय हवाई दलसुद्धा मदतकार्यात उतरले आहे. तांबाराम येथील तळावरून हवाई दलाच्या विमानांनी सोमवारी रात्री अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी अशा मदतीसह सहा फेऱ्या केल्या. तसेच नागरिकांचे स्थलांतर करण्यातही हवाई दलाच्या जवानांनी स्वतला जुंपून घेतले आहे.
चेंबरामबक्कम धरणातील विसर्ग वाढल्यामुळे अडय़ार नदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे काठावरील कोट्टुरपुरम व इतर भागांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. हवाई दलासह नौदल व तटरक्षक दलानेही या संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसली असून तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आतापर्यंत ५०० किलो ब्रेड, बिस्किटे आणि पिण्याचे पाणी तांबाराममधील नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे. नौदलानेसुद्धा ‘आयएनएस राजाली’वरील हेलिकॉप्टर अरक्कोणम येथे तैनात केले आहे. तांबारामसह कोट्टुरपुरम व मानाली येथे नौदलाच्या बोटी नागरिकांच्या मदतकार्यात जुंपल्या असून विशाखापट्टणम येथेही जय्यत तयारी करण्यात आल्याचे नौदलाच्या तामिळनाडू व पुदुच्चेरी विभागाचे प्रमुख आलोक भटनागर यांनी सांगितले. आतापर्यंत या पावसाने ७१ जणांचा बळी घेतला आहे. या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सोमवारी ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

‘ओला’च्या बोटी!

टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ने नागरिकांच्या मदतीसाठी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर बोटी उतरवल्या. व्यावसायिक नौकानयनपटूंच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या या बोटी चेन्नईकरांना सुरक्षित स्थळी घेऊन जात आहेत. मोफत प्रवासासह प्रवाशांना अन्न-पाणीही दिले जात आहे. या बोटी एका फेरीत सुमारे नऊ जणांची ने-आण करीत असून प्रत्येक बोटीत दोन नौकानयनपटू आणि पुरेशा छत्र्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कंपनीचे राज्याचे व्यवसायप्रमुख रवी तेजा यांनी दिली. ही बोट सेवा पुढील तीन दिवस सुरू राहील.