उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात चीफ इंजिनीअर ठार झाला आहे. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून भाविकांना घेऊन हरिद्वारच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन पायलट जखमी झाले आहेत. तर भाविक सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर मुंबईतील क्रिस्टल कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरने शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास बद्रीनाथहून उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. घटनास्थळी वीजेच्या ताराही होत्या. त्यांच्याशी हेलिकॉप्टरचा संपर्क आला असता तर मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव एस. रामास्वामी यांनी गढवालचे आयुक्त विनोद शर्मा यांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरी उड्डाण विभागाच्या महासंचालकांना या घटनेची माहिती दिली आहे. घटनेनंतर हेलिकॉप्टरच्या बाहेर पडताना ब्लेड लागल्याने इंजिनीअरचा मृत्यू झाला. तर दोन पायलट जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी दिली आहे. हेलिकॉप्टरमधील पाच भाविक सुखरुप आहेत. विक्रम लांबा असे मृत इंजिनीअरचे नाव आहे. या घटनेची माहिती लांबा यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.