जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्य़ात वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पच्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळून सहा यात्रेकरू व महिला पायलट असे एकूण सात जण ठार झाले. हेलिकॉप्टर खासगी विमान कंपनीचे होते.
त्रिकुटा हिल्स येथील सन्जीचाट हेलिपॅडवरून निघालेले हे हेलिकॉप्टर कटरा येथे नवीन बस स्थानक भागात कोसळले, असे पोलिस महानिरीक्षक दानिश राणा यांनी सांगितले. या दुर्घटनेत सात जण ठार झाले असून त्यात एका महिला पायलटचा समावेश आहे, असे उधमपूर- रियासीचे पोलिस उप महानिरीक्षक सुरिंदर गुप्ता यांनी म्हटले आहे.
हेलिकॉप्टर हवेतच पेटले व वैमानिकाने गर्दीच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर पडू दिले नाही. अनेक यात्रेकरून वैष्णोदेवीला हेलिकॉप्टरने जातात व काही जण पायी जातात. वैष्णोदेवी हे ठिकाण त्रिकुटा टेकडय़ांवर ५३०० फूट उंचीवर असून कटरा हे ठिकाण जम्मूपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. या अपघातात मरण पावलेल्यात एका नवपरिणित दांपत्याचा समावेश होता. वैमानिक सुमिता विजयन (हैदराबाद)तसेच जम्मूचे अर्जुन सिंग, महेश व वंदना, दिल्लीचे सचिन व अक्षिता यांचा मृतात समावेश आहे. हिमालयन हेली सव्‍‌र्हिसचे हेलिकॉप्टर होते. माता वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अजित कुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांचा २५ लाखांचा विमा होता. वैष्णोदेवी मंदिर मंडळाने प्रत्येकी ३ लाखांची भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २८ लाख रूपये देण्यात येणार आहेत.