जम्मू : जम्मू काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिरात घोडी व खेचरांवरून जाणाऱ्या भक्तगणांना शिरस्त्राण (हेल्मेट), गुडघा व कोपर यांना संरक्षण देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात घोडी-खेचरांवरून जाणाऱ्यांना शिरस्त्राण सक्ती केली आहे.

पायी जाणाऱ्यांनीही शिरस्त्राण वापरणे अपेक्षित आहे, पण सक्ती केलेली नाही.  दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना अनेकदा अपघात होऊन ते जायबंदी होतात हे टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाताना एक लष्करी अधिकारी मरण पावला होता, तसेच यापूर्वी अनेकदा भक्तगण जखमी झाले आहेत. टेकडीवरून घसरत येणारे दगड किंवा घोडय़ावरून पडून हे लोक जखमी होतात. पायी जाणाऱ्या भक्तगणांना शिरस्त्राण परिधान करण्याची सूचना देण्यात आली आहे, पण जे लोक घोडय़ावरून वर जाणार आहेत त्यांना शिरस्त्राणाची सक्ती केली आहे.

माता वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरणदीप सिंग यांनी ही योजना सादर केली आहे. २०१८ मध्ये वैष्णोदेवीला ८६ लाख भक्तगणांनी भेट दिली होती. १९८६ मध्ये मंडळाने या देवस्थानचा कारभार हाती घेतला होता. त्या वेळी भक्तगणांची संख्या १४ लाख होती, आता त्यात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये १.०५  कोटी भाविकांनी वैष्णोदेवीला भेट दिली होती.