भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. सर्व भारतीय बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिल्या. बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले.

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील एक प्रांत असून हिंसाचारामुळे चर्चेत आहे. फाळणीपासून म्हणजेच १९४७ पासूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जनतेतून केली जात आहे. ११ ऑगस्टला १९४७ रोजी आम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरूवारी भारताच्या ७३ स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांनी भारतातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही भारताशी जोडले गेलेलो असून पाकिस्तानच्या जोखडातून बलुचिस्तानला स्वतंत्र करायचे आहे. त्यामुळे भारताने मदत करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

बलुचिस्तान स्वतंत्र चळवळीचे कार्यकर्ते अत्ता बलोच म्हणाले, माझ्या सर्व भारतीय बंधु भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. गेल्या ७० वर्षात केलेले कामगिरीचा भारतीयांना अभिमान आहे. जगभरात असलेले भारतीय अभिमानाने वावरत आहेत. बलुचिस्तान भारताशी जोडला गेला आहे आणि आम्हाला मदत हवी आहे. भारताने बलुचिस्तानचा आवाज व्हावे, अशी हाक अत्ता यांनी दिली आहे.

याच चळवळीत काम करणारे अश्रफ शेरजान म्हणाले, भारतीयांना शुभेच्छा. बलुचिस्तानची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रासह सर्वच जागतिक व्यासपीठावर जोमाने मांडावी. पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून बलुचिस्तानातील लोकांची कत्तल सुरू आहे. बलुचिस्तान रक्तबंबाळ झाला आहे, असे शेरजान म्हणाले.