आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर भाजपचे खासदार आर. के. सिंह यांनी टीका केली आहे. ललित मोदी यांना मदत करणे कायदेशीर आणि नैतिकदृष्टय़ा अयोग्य असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले आहे. आर. के. सिंह हे माजी गृहसचिव आहेत.
स्वराज आणि वसुंधराराजे यांच्यावर टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी मौन पाळले असले तरी भाजपच्या खासदाराने मात्र स्वराज यांच्यावर तोफ डागल्याने स्वपक्षीय नेते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र सिंह यांनी स्वराज अथवा वसुंधराराजे यांचा नामोल्लेख या वेळी केला नाही. मोदी यांना भारतात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे खासदार सिंह यांनी म्हटले आहे. सत्तारूढ पक्षाच्या खासदाराने या प्रश्नावर प्रथमच जाहीर टीका केली आहे. पळपुटय़ाला कोणी मदत केली असल्यास ते अयोग्य आहे, कोणी पळपुटय़ाची भेट घेतली असेल तर तेही योग्य नाही, ललित मोदी यांना ज्यांनी मदत केली ते पूर्णत: अयोग्य आहे, असे सिंह म्हणाले. मोदी यांचे पारपत्र (पासपोर्ट) देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला त्याविरुद्ध सरकारने याचिका करावी आणि गरज बासल्यास ललित मोदी यांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीही सिंह यांनी केली. त्याचप्रमाणे मोदी यांना भारतात आणण्यासाठी सर्व उपाययोजना आखाव्या, असेही ते म्हणाले.
भाजपचे घूमजाव
परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये भरतो, असे मोदी कधी बोललेच नसल्याचे भाजपने मंगळवारी स्पष्ट केले आहे.