अमेरिकेच्या अखेरच्या तैनाती फौजा ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघारी येतील, या अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या घोषणेने नंतर अफगाणीस्तानमध्ये भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. सैन्याच्या माघारीआधीच अफगाणिस्तानातील ८५ टक्के भूभाग व्यापल्याचा दावा तालिबानने केला आहे. दरम्यान तालिबानशी लढा देणार्‍या अफगाणिस्तानातील नेत्यांनी पाकिस्तान उघडपणे तालिबान्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. आता अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी फोटो ट्विट करत पाकिस्तानवर टीका केली आहे.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी ट्विट केलेला फोटो म्हणजे पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराला शरण जाण्याचा आहे. हा फोटो पोस्ट करताना अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानवर टीका देखील केली आहे. “आमच्या इतिहासात असे चित्र नाही आणि कधीही होणार नाही. होय, काल आमच्यावरुन जात असलेले रॉकेट काही मीटर अंतरावर कोसळले तेव्हा मी क्षणभर घाबरलो. पाकिस्तानातील प्रिय ट्विटर हल्लेखोरांनो, तालिबान आणि दहशतवाद या आपल्या जखमांवर औषध लावणार नाही. आणखी काही मार्ग शोधा,” असे त्यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी पोस्ट केलेला फोटो १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा भारताकडून झालेल्या पराभवाचा आहे. या युद्धात भारताने शत्रूंना शरण जाण्यास भाग पाडले होते. भारताने मोठ्या प्रमाणात हानी केल्यानंतर पाकिस्तानने या युद्धात आपला पराभव स्वीकारला होता.

१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होतील. या युद्धात भारतीय सैन्याने अपरिमित शौर्य गाजवून पाकिस्तानला चारी मुंडय़ा चीत केले होते. भारताने युद्ध जिंकल्यानंतर बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशा यांनी नियोजनबद्ध युद्धनिती प्रत्यक्ष युद्धात वापरली होती.

पाकिस्तानने पराभव स्वीकारल्यानंतर हा फोटो काढला गेला आहे. त्यावेळी पाकिस्तानच्या ८० हजाराहून अधिक सैनिकांनी भारताचे शौर्य आणि धैर्य पाहून आपले प्राण वाचवण्यासाठी आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्करप्रमुखांसमक्ष आत्मसमर्पण पत्रांवर सही केली होती. पाकिस्तानच्या पराभवाशी संबंधित हा फोटो पोस्ट करून अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी पाकिस्तावर जोरदार टीका केली आहे.

तालिबानने अफगाणिस्तान दहशत माजवण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तानने तालिबान्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाकिस्तानने जाहीर केले आहे की जर अफगाणिस्तानने तालिबानचा विरोध केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती म्हणाले होते.

अलीकडेच तालिबान्यांनी अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये राष्ट्रपती निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि तीन रॉकेट सोडले होते. रॉकेट हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या रॉकेट हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी सांगितले आहे.