X

खासदार हेमा मालिनी मथुरेसाठी काय केलं तेच विसरल्या

'मथुरावासियांसाठी बरीच कामं केली, पण आता आठवत नाही,'; हेमा मालिनी यांना स्वत:च्याच कामाचा विसर

खासदार हेमा मालिनी यांना त्यांच्या कामाचा लेखाजोखा विचारला असता त्यांनी अजबच उत्तर दिलं. आपल्या मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत काय काय कामं केलीत असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, ‘मथुरावासियांसाठी मी खूप कामं केली आहेत पण मला आता काही आठवत नाहीये,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

भाजपाकडून हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघातून उमेदवारीचं तिकीट मिळालं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ही जागा पुन्हा एकदा जिंकण्याबाबत काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. ‘मथुरासाठी मी रस्त्यांची आणि इतर बरीच कामं केली आहेत. पण आता मला ते आठवून सांगता येणार नाहीत. पण माझ्या मतदारसंघातील लोक माझ्या कामाने खूश आहेत आणि मी पुन्हा निवडून येईन असा मला विश्वास आहे,’ असं त्या म्हणाल्या.

२००३ ते २००९ या कालावधीत त्या राज्यसभा सदस्य होत्या. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांना मथुरा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं होतं आणि त्या जागेवर त्या बहुमतानं निवडून आल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत भाजपा हेमा मालिनी यांना डावलून श्रीकांत वर्मा यांनी तिकीट देण्याची चर्चा होती. पण अखेर हेमा मालिनी यांनाच तिकीट मिळालं. हेमा मालिनीविरोधात डान्सर सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. सपना चौधरी काँग्रेस पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण या सर्व चर्चा निव्वळ अफवा असून आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सपनाने रविवारी स्पष्ट केलं.

First Published on: March 25, 2019 6:08 pm