भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद शमत नाही तोवर भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी देखील हेमंत करकरेंविषयी भाष्य केले आहे. हेमंत करकरे शहीद झाले. पण महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका चुकीचीच होती, असे त्यांनी म्हटले आहे.

सुमित्रा महाजन यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देताना हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले. सुमित्रा महाजन म्हणतात, माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत. पण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे हे मित्र होते असे मी ऐकून आहे. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करायचे. संघ बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप ते करायचे, याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले.

सुमित्रा महाजन यांनी दिलीप पाटीदार या तरुणाचा मुद्दाही उपस्थित केला. दिलीप पाटीदार याला महाराष्ट्र एटीएसने २००८ साली इंदूरमधून अटक केली होती. मात्र, त्यानंतर दिलीप पाटीदार हा बेपत्ता झाला असून या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती, असे महाजन यांनी सांगितले. दिलीप पाटीदारचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणाबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

सुमित्रा महाजन यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन सुमित्रा महाजन यांना प्रत्युत्तर दिले. देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तीसोबत माझे नाव जोडणे हे माझ्यासाठी अभिमानास्पदच आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना माझा नेहमीच विरोध राहणार, असे सांगत त्यांनी भाजपावर पलटवार केला आहे.