News Flash

जाणून घ्या, भारतीय जवानांचा जीव घेणाऱ्या ‘बॅट’बद्दल

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यामागे 'बॅट'चा हात

पाकिस्तानची बॉर्डर एॅक्शन टीम (बॅट)

सोमवारी जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये दोन भारतीय जवानांची हत्या करत त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमने (BAT) हे संतापजनक कृत्य केले. बीएसएफचे जवाना प्रेम सागर आणि परमजीत सिंग यांच्या मृतदेहाची विटंबना बॅटकडून करण्यात आली. यावेळी बीएसएफची १० सदस्यांचे पथक गस्त घालत होते. भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्याचे घृणास्पद कृत्य करणारी पाकिस्तानची बॉर्डर ऍक्शन टीम म्हणजे नेमके काय आणि ही टिम नेमक्या कोणत्या कारवाया करते, ते जाणून घेऊयात.

– पाकिस्तानकडून बॉर्डर ऍक्शन टीमचा वापर नियंत्रण रेषेजवळ छापे टाकण्यासाठी केला जातो. पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल सर्विस ग्रुप बॅटचा प्रमुख हिस्सा आहे. लपूनछपून छापे टाकणे आणि कोणत्याही मार्गांचा अवलंब करुन भारतीय सैन्याच्या वरचढ कारवाया करणे, ही जबाबदारी बॅटकडे असते.
– ‘बॅटमध्ये बंडखोरांचादेखील समावेश असतो. हे बंडखोर बॅटला विविध मोहिमांमध्ये सक्रीय करतात,’ अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. स्पेशल सर्विस ग्रुपमधील कमांडोंना पाकिस्तानमध्ये सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाते. बॅटच्या गणवेशामुळे त्यांना ब्लॅक स्टॉर्क्सदेखील म्हटले जाते.
– नियंत्रण रेषेवर लहान आणि वेगवान कारवाया बॅटसाठी नव्या नाहीत. बॅटकडून अनेकदा अशा कारवाया नियंत्रण रेषेवर करण्यात आल्या आहेत.
– बॅटनेच भारतीय जवान हेमराज यांचा शिरच्छेद केला होता. याआधी २०१३ मध्ये बॅटने ५ जवानांचा निर्दयीपणे शिरच्छेद केला होता.
– ‘बॅटच्या एका टीममध्ये ४ ते १० जवान असतात. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवरील कारवाईचे समर्थन केले जाते,’ असे २०१२ ते २०१४ या कालावधीत भारताचे डीजीएमओ (लष्करी कारवायांचे प्रमुख) असलेल्या लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी सांगितले.

अशाप्रकारे होते प्रशिक्षण-

बॅटसाठी निवड करण्यात आलेल्या सैनिकांना ८ महिने पाकिस्तानी लष्करात आणि ४ आठवडे पाकिस्तानच्या हवाई दलात प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. बॅटमधील सैनिक गनिमी काव्याने हल्ला करण्यात तरबेज असतात. या टीममध्ये दहशतवाद्यांनादेखील सामील करुन घेतले जाते. दहशतवादी पकडले गेल्यास त्याचा आरोप पाकिस्तानवर लागू नये, यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलले जाते.

याआधीच्या बॅटच्या कारवाया-
– २०१६ मध्ये बॅटने नियंत्रण रेषेवरील माछिल सेक्टरमध्ये भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती.
– २००८ मध्ये २/८ गोरखा रायफल्सच्या एका जवानाचे बॅटकडून अपहरण करण्यात आले होते आणि काही दिवसांनी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
– २००० साली अशोक लिस्निंग पोस्टवर तैनात असलेल्या ७ भारतीय जवानांची बॅटकडून हत्या करण्यात आली.
– कारगिल युद्धावेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा बॅटने प्रचंड प्रमाणात छळ केला होता. यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह भारताला सोपवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 5:23 pm

Web Title: here is everything you need to know about pakistans bat
Next Stories
1 काँग्रेसच्या काळात केवळ एकदाच मृतदेहाची विटंबना झाली- ए.के.अँटोनी
2 मोदींच्या आवाहनाला मध्य प्रदेशची ‘साथ’; जानेवारी-डिसेंबर आर्थिक वर्ष करणार
3 अमेरिकेत भारतीय तरुणाने वाचवले महिलेचे प्राण, पण…
Just Now!
X