चंद्रकांत पाटील यांची माहिती; शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ

मदर्स डेअरीचे किरकोळ विक्री साखळीचे जे सफल प्रारूप आहे, ते महाराष्ट्र सरकारही राबवेल व त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळण्यास मदत होईल, असे राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले. महाराष्ट्र सरकार सफलसारखी दुकाने चालवणार नाही तर  शेतकरी सहकारी संस्था किंवा कंपन्यांना ती सुरू करण्यास सांगेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील अधिकारी सफल किरकोळ विक्री दुकानांच्या प्रारूपाचा अभ्यास करीत आहे. त्याचबरोबर दुबईच्या गल्फ फूड या प्रारूपाचाही विचार केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतक ऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या विक्री प्रारूपांचा अभ्यास करीत आहोत. सफलच्या प्रारूपाने आम्ही प्रभावित झालो असून तशी किरकोळ विक्री दुकाने महाराष्ट्रातही सुरू करण्याचा विचार आहे. सफलच्या वितरण व प्रक्रिया प्रकल्पास मंगोलपुरी येथे चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. राज्य सरकारने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी याबाबत सामंजस्य करार केला असून मदर डेअरी या मंडळाच्या अखत्यारीत येते. महाराष्ट्रात फळे व भाजीपाला मोठय़ा प्रमाणात होतो पण राज्यात शेतक ऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्याची सोय नाही, त्यासाठी हे  प्रारूप वापरले जाणार आहे. सरकार अशी दुकाने सुरू करणार नाही पण शेतकरी सहकारी संस्थांना तशी केंद्रे सुरू करण्यास सांगितले जाईल किंवा कंपन्यांना त्यात पुढाकार घेण्यास सांगितले जाईल. कोकणातील काजू सफलच्या दुकानांमधून विकण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.