हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील गोहानामधील बुटाना पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर दारू पिणाऱ्यांना विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) कप्तान सिंग (४३) आणि शिपाई रविंद्र (२८) यांनी हटकले. काठी घेऊन या दारुड्यांना समज देण्यासाठी कर्मचारी त्यांच्या जवळ गेले असता दारुड्यांनी या दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला करु घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र जखमी अवस्थेत असणाऱ्या शिपाई रविंद्रने निर्मनुष्य ठिकाणी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रसंगावधान दाखवत हल्लेखोरांच्या गाडीचा क्रामांक पेनने आपल्या तळहातावर लिहून ठेवला. दोघांच्याही मृत्यूनंतर रविंद्रच्या शवविच्छेदनादरम्यान तळहातावर हा नंबर आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आणि याच क्रमांकाच्या मदतीने हल्लेखोरांना जेरबंद केल्याचे वृत्त एनडी टीव्हीने दिलं आहे.

अज्ञात स्थळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर पोलीस खात्याने वेगवेगळ्या तुकड्या बनवून या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्याच कालावधीमध्ये रविंद्रच्या हातावर एका गाडीचा क्रमांक सापडल्याची माहिती रुग्णालयामधून पोलिसांना मिळाली. रविंद्रच्या हातावर एचआर ५६ बी ८१९२ असा क्रमांक लिहिल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिसलं. पोलिसांनी या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी गाडीचा आणि गाडीच्या मालकाचा तपास सुरु केला.

अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांना या क्रमांकाने नोंदणी करण्यात आलेली ग्रॅण्ड आय -१ ० गाडी जींद येथे राहणाऱ्या गुरमीत नावाच्या व्यक्तीच्या मालकीची असल्याचे समजले.  पोलीस गुरमीतच्या घरी पोहचले तेव्हा काही काळापूर्वीच ही गाडी संदीप नावाच्या व्यक्तीला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गाडीचा व्यवहार झाला असला तरी कागदपत्र मात्र गुरमीतच्याच नावावर असल्याचे पोलिसांना समजले. म्हणजेच नव्या गाडीमधून जाताना संदीप आणि त्याच्या मित्रांनीच दारुच्या नशेत पोलिसांवर हल्ला केल्याच्या संक्षयावरुन पोलिसांनी तातडीने संदीप आणि त्याचा मित्र अमित तसेच विकास यांचा शोध घेतला.

पोलीस या तिघांना ताब्यात घेण्यासाठी पोहचले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये अमितचा मृत्यू झाला. तर संदीपला पोलिसांनी अटक केली आहे. विकास पळून जाण्यात यशस्वी ठरला असला तरी पोलीस त्याच्या मागावर आहेत.