पंजाबमधील अमृतसर जिल्ह्य़ातील अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करून सीमा सुरक्षा दलाने त्यांच्याजवळून २० कोटी रुपयांच्या हेरॉईनसह शस्त्रे व दारुगोळा जप्त केला.
जिल्ह्य़ातील धुग गावात राहणाऱ्या रांझा सिंग आणि सोनु कुमार शर्मा यांना शनिवारी अटक करून त्यांच्याजवळून ४ किलो हेरॉईन, ९ एमएमचे एक पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली. हेरॉईनची बाजार भावाने २० कोटी रुपये किंमत आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे उप महानिरीक्षक आर. एस. कटारिया यांनी सांगितले.
पाकिस्तानहून अमली पदार्थ कोण पाठवत होते आणि भारतीय तस्करांचा त्यांच्याशी कसा संपर्क होता याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.