गायक-संगीतकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे, काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत विरोध दर्शवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अदनान सामी यांनी काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी केलेल्या टीकेला ट्विटद्वारे खरमरीत उत्तर दिले आहे.
“हे मुला, तुला तुझा मेंदू ‘क्लिअरन्स सेल’मधुन किंवा एखाद्या ‘नॉव्हलटी स्टोअर’मधुन मिळाला आहे का? बर्कलेमध्ये तुम्हाला हेच शिकवले का? की एखाद्या मुलास त्याच्या आई-वडिलांच्या कृत्याबद्दल उत्तरदायी ठरवले जावे किंवा शिक्षा दिली पाहिजे? आणि तुम्ही एक वकील आहात? हेच तुम्ही लॉ स्कुलमध्ये शिकला आहात का? शुभेच्छा..” असं अदनान सामी यांनी शेरगील यांच्या ट्विटला उत्तर दिलेलं आहे.
Hey kid, did you get ur brain from a ‘Clearance Sale’ or from a second hand novelty store?
Did they teach u in Berkley that a son is to be held accountable or penalised for the acts of his parents? And ur a lawyer?
Is that what u learned in law school? Good luck with that!https://t.co/s1mgusEdDr— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 26, 2020
काँग्रेसचे प्रवक्ता जयवीर शेरगील यांनी अदानान सामी यांना जाहीर झालेल्या पुरस्काराच्या मुद्यावरूवन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कारगील युद्धामध्ये आपलं सर्वस्व झोकून देणारे व माजी लष्कर अधिकारी मोहम्मद सनाउल्लाह यांना विदेशी म्हणून घोषित केलं. तर दुसरीकडं भारताविरुद्ध लढणाऱ्या एका पाकिस्तानी हवाई दलातील वैमानिकाच्या मुलाला देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्यामुळे हे घडलं आहे”, असं शेरगील यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर राष्ट्रावादी काँग्रेसेचे प्रवक्ते व राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी देखील अदनान सामी यांच्या पुरस्काराबाबत केंद्र सरकावर टीका केली आहे.“हे स्पष्टच आहे की, जर कोणी पाकिस्तानातून ‘जय मोदी’चा नारा देत असले, तर त्याला या देशाच्या नागरिकत्वाबरोबच पद्मश्री पुरस्कार मिळेल. हा देशातील जनेचा अपमान आहे. असं मलिक यांनी म्हटलं आहे.
या अगोदर मनसेकडूनही सामी यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचा विरोध करण्यात आला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, मोदी सरकारने अदनान सामी यांना दिलेला पुरस्कार परत घ्यावा. तसेच, आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 4:16 pm