बेरुतमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर हिज्बुल्लाच्या प्रमुखाने इस्रायलला धमकी दिली आहे. भविष्यातील इस्रायलचे हल्ले उधळून लावण्यासाठी सर्वकाही करु असे हिज्बुल्लाच्या प्रमुखाने म्हटले आहे. हिज्बुल्लाची लेबनॉनमध्ये महत्वाची राजकीय भूमिका असली तरी अमेरिका आणि इस्रायलसाठी हिज्बुल्ला एक दहशतवादी संघटना आहे. हिज्बुल्ला आणि इस्रायलमध्ये आतापर्यंत अनेक लढाया झाल्या आहेत. शेजाऱ्या सीरियामध्ये हल्ले केल्याचे इस्रायलने जाहीर केल्यानंतर बेरुतमध्ये ही घटना घडली. इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये हिज्बुल्लाचे दोन सदस्य ठार झाल्याची माहिती संघटनेचा प्रमुख नस्रल्लाहने दिली आहे.

हसन नस्रल्लाहने दूरचित्रवाहिनीवरुन हिज्बुल्लाच्या हजारो समर्थकांना संबोधित केले. बेरुतच्या दक्षिणेला असलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. २००६ मध्ये इस्रायल आणि हिज्बुल्लामध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर प्रथमच इस्रायलने अशी आक्रमकता दाखवली आहे असे हसन नस्रल्लाह म्हणाला. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी हिज्बुल्ला सर्व काही करेल. इस्रायली विमान येणार आणि लेबनॉनमध्ये बॉम्बफेक करुन निघून जाणार तो काळ आता राहिलेला नाही.

सीमेवर तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांनी आज रात्रीपासून तयार रहावे. काय करतो ते पाहा असा इशारा हसन नस्रल्लाहने दिला आहे. २००६ साली हिज्बुल्ला आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले होते. ३३ दिवसांच्या या युद्धात लेबनॉनमध्ये १२०० जणांचा तर इस्रायलमध्ये १६० जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले होते.