काही संशयित व्यक्तींच्या हालचालींबाबतचे पाकिस्तानमधून झालेले संभाषण सुरक्षा यंत्रणांनी ऐकल्यानंतर पंजाबच्या सीमेवरील गुरुदासपूर व पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्य़ांमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पठाणकोट व गुरुदासपूर जिल्ह्य़ात, विशेषत: बटाला शहरात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून, लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलिसांनी व्यापक प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू केली असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी १-२ जानेवारीच्या मध्यरात्री पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला केला होता, तर गुरुदासपूरमधील दिनानगरला गेल्या वर्षी २७ जुलै रोजी लक्ष्य करण्यात आले होते.

पाकिस्तानमधून आलेला एक कॉल शुक्रवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांनी ‘इंटरसेप्ट’ केला. यात संभाषण करणारे लोक संशयिताच्या पठाणकोट किंवा दिनानगर येथे ट्रकमधून जाण्याबद्दल बोलत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांनी उशिरा रात्री स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स टीम (स्व्ॉट) आणि बीएसएफचे कर्मचारी यांच्यासह ४०० जणांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम राबवली.

या प्रकरणी आम्ही कुठलाही धोका पत्करत नसून गुरुदासपूर, पठाणकोट व बटालाच्या सीमाभागात सुरक्षाव्यवस्था आवळण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर व हिमाचल प्रदेशकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, असे गुरुदासपूर येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बीएसएफच्या सहकार्याने प्रवेशाच्या ठिकाणी विशेष ‘नाके’ उभारण्यात आले असून, भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील भागात चोख दक्षता बाळगण्यात येत आहे असे पोलिसांनी सांगितले.