पुरानंतर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये स्थिती पूर्वपदावर

नवी दिल्ली : पुरामुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील स्थिती पूर्वपदावर येत असून ओदिशा, केरळमध्ये मात्र अजूनही पावसाने थैमान घातलेले आहे. केरळमधील तीन राज्यांत दक्षतेचा इशारा देण्यात आला असून केरळमध्ये पूरबळींची संख्या ८८ झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने केरळमधील एर्नाकुलम, इडुकी आणि अलाप्पुझा या तीन जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तेथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. थिरुअननंतपूरमचे हवामान विभाग संचालक के. संतोष यांनी ही माहिती दिली. केरळमधील उत्तरेकडील जिल्ह्य़ांमधील पूरस्थिती मात्र निवळत असून दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात अद्याप ४० जण बेपत्ता आहेत.

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील बचाव मोहीम संपली असून पुराचे पाणीही ओसरत आहे. तेथे जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे कार्य मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कर्नाटकातील स्थितीही निवळत आहे. कर्नाटक सरकारने पुरामुळे स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ओदिशातील पुराचा फटका रेल्वेला मोठय़ा प्रमाणात बसला आहे. तेथेही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.